राज ठाकरेंनी ती डॉक्युमेंट्री पोस्ट सोशल मीडियातून केली डिलिट

Foto
मुंबई : अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सबीर भाटिया यांची एक डॉक्युमेंट्री त्यांच्या सोशल मीडियातून पोस्ट केली होती. यावर लोकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. ४८ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले. फेसबुकलाही तितकाच रिस्पॉन्स मिळाला. मात्र आता ही पोस्ट राज ठाकरे यांनी डिलिट केली आहे. हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती तो हेतू साध्य झाला असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले.

राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होते. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी. मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं. यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे. पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच. म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलिट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे असे त्यांनी सांगितले.

तसेच जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील. आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसर्‍यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय असं सांगत राज ठाकरे यांनी त्यांच्या जुन्या भाषणातील क्लिप पुन्हा शेअर केली आहे.